सांगोला लायन्स क्लबकडून अभियंत्यांचा सन्मान
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला लायन्स क्लबकडून दरवर्षी विविध दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला जातो. यावर्षी अभियंता दिनाचे औचित्य साधत याच परिसरात जडणघडण झालेल्या, या परिसरात शिक्षण घेतलेल्या, आपल्या कर्मभूमीला जन्मभूमी इतकेच श्रेष्ठ मानत अभियंता म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा लायन्स क्लबकडून सन्मान होतो आहे ही बाब मनाला मनस्वी आनंद देणारी आहे. असे प्रतिपादन लायन्स प्रांत ३२३४ ड१ माजी प्रांतपाल, मार्गदर्शक ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ सांगोला आयोजित अभियंता दिनानिमित्त 'सन्मान कर्तृत्वाचा गौरव अभियंत्यांचा' या कार्यक्रमाअंतर्गत अभियंता सत्कार समारंभमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड व सत्कारमूर्ती अभियंता हर्षल काळे, मनीष कांबळे, सागर आवताडे, आकाश म्हेत्रे उपस्थित होते.
माजी प्रांतपाल ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बुके देऊन अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना अभियंता मनीष कांबळे व सागर आवताडे यांनी सांगोला विद्यामंदिरमध्ये मिळालेले संस्कार व ज्ञान भविष्यकाळात आम्हाला प्रगती करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरले आहेत.आज याच प्रांगणात आदरणीय झपके सरांच्या हस्ते सत्कार होतो आहे ही खूप आनंद देणारी बाब आहे. असे सांगत आयोजकांना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमासाठी सांगोला लायन्स क्लबचे सचिव ला.अजिंक्य झपके, संचालक ला.प्रा.अमर गुळमिरे, सदस्य व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर यांनी केले. सूत्रसंचालन लायन्स कॅबिनेट ऑफिसर ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर लायन्स सदस्य ला.प्रा.मिलिंद देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.