क्रांतिवीर न्यासाच्या वतीने संजय साळुंखे यांना क्रां. वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान
पंढरपूर (प्रतिनिधी) - धर्मांधांची आक्रमकता सुनियोजित व संघटित रित्या चालु असून लव्ह जिहाद सारखी आक्रमणं रोखण्यासाठी हिंदु समाजाने जागरुक राहिले पाहिजे, तसेच मुला-मुलींना धर्मशिक्षण देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सोलापूरचे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते संजय साळुंखे यांनी केले.
गोवा मुक्तिसंग्रामामध्ये विलक्षण क्रांतिकार्य केलेल्या, पुरुषार्थ गाजवलेल्या क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हिंदुत्व शौर्य पुरस्कार लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या माता-भगिनींची सुटका करणार्या संजय साळुंखे यांना देण्यात आला या प्रसंगी सांळुखे बोलत होते. पंढरपूरातील सद्गुरु गुंडा महाराज संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. चक्रीनाथमहाराज सिध्दरस यांच्या शुभहस्ते तर ह.भ.प. लक्ष्मणमहाराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी क्रांतिवीर बडवे न्यासाचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर व मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना ह.भ.प. चक्रीनाथमहाराज सिध्दरस यांनी पौराणिक दाखले देत बलोपासना करीत धर्मरक्षण करण्यासाठी क्षात्रवृत्ती जागविण्याची गरज असून जातिविरहित हिंदु समाजाने एकत्र येण्याची आवशकता प्रतिपादन केली. या प्रसंगी ह.भ.प. लक्ष्मणमहाराज चव्हाण बोलताना म्हणाले की, वारकरी संप्रदाय व हिंदुसमाज वेगळा असूच शकत नाहीत, प्रत्येक वारकर्याने व सांप्रदायिक महाराजांनी धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण यासाठी आपल्या कीर्तन-प्रवचनातून समाज जागृती करणे आवश्यक आहे. हिंदुसभा नेते व क्रांतिवीर वसंतबाबाजी बडवे न्यासाचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद करीत हिंदु रक्षणाचे काम हे शौर्याचे काम असून ते करणार्या वीराला हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यत महाराष्ट्रातील अनेक लढवय्ये हिंदुत्वनिष्ठांना त्यांच्या कार्याचा गौरव व श्रीविठठ्लाचा व संतांचा आशिर्वाद म्हणून कोणत्याही अपेक्षेविना हा पुरस्कार दिला गेला आहे. संजय साळुंखे यांनी आपला जीव धोक्यात घालीत धर्माध मुस्लिमांच्या तावडीतून अनेक हिंदु तरुणींची सुटका केली व त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. तसेच अनेक मुलींचा विवाह हिंदु युवकांबरोबर करुन दिला. त्यामुळे त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. गोठयातील गाय व घरातील माय सुरक्षित असणे म्हणजेच हिंदुराष्ट्र आहे आणि ते साळुंंखे सारख्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यामुळे निर्माण होणार आहे.
रुक्मिणी पटांगणातील क्रांतिवीर वसंतबाबाजी बडवे यांच्या पुतळ्या समोर झालेल्या कार्यक्रमाचा प्रारंभ स्वातंत्र्यवीरांच्या अखिल हिंदु विजय ध्वज गीताने झाला. महेश खिस्ते यांनी पुरस्काराचा, पुरस्कारार्थी व अन्य मान्यवरांचा परिचय करुन दिला. विवेक बेणारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुख्य पुरस्काराच्या प्रदानाचा कार्यक्रम पार पाडला ज्यात शाल, श्रीफल, अखिल हिंदुसभेचा कुंडलिनी कृपाणांकित ध्वज व ११,००० रुपये रोख धनराशी (रक्कम) व मानपत्र असं स्वरुप होते.
या कार्यक्रमास सोलापूर हिंदुमहासभा अध्यक्ष सुधाकर बहिरवाडे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते संजयकाका होमकर, मोहनराव मंगळवेढेकर, आनंद उत्पात आदि मान्यवर उपस्थित होते. पंढरपूर हिंदुमहासभेचे अध्यक्ष विकास मोरे यांनी आभार प्रदर्शन केले आणि तुकाराम चिंचणीकर यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत खंडागळे, दिपक कुलकर्णी ओंकार वाटाणे, विठ्ठल बडवे, अनिकेत बडवे, पंडीत भोले पुणेकर आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.