बाईक रॅली काढून अभिजीत पाटील यांचे पांढरेवाडी येथे ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत
पंढरपूर (प्रतिनिधी) - माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माढा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर, पांढरेवाडी, जाधववाडी, वरवडे, वाफेगाव, वाघोली, लवंग, महाळूंग या गावांना भेट दिली. यावेळी मेंढापूर ते पांढरेवाडी दरम्यान अभिजीत पाटील यांचे बाईक रॅली काढून ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, माझ्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना मदतीचा हात मिळाला पाहिजे हा एकच विचार घेऊन मी आपल्या समोर आलो आहे. मी सत्ता मिळावी म्हणून आपल्यासमोर उभा नाही तर परिवर्तनासाठी आपल्यासमोर आलो आहे असे आवाहन त्यानी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रदीर्घकाळ सत्तेत राहूनही प्रस्थापितांना माढा मतदार संघातील नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा पुरविता आल्या नाही हे दुर्दैव आहे. म्हणूनच आदरणीय पवार साहेबांनी माढा मतदार संघातील जनेतेच्या मनातील ओळखून या शेतकऱ्याच्या पोराला उमेदवारी दिली आहे. यंदाची निवडणूक आता जनतेनं हाती घेतली आहे. अन्यायी प्रस्थापितांना जनता धडा शिकवत यंदा परिवर्तन घडवून आणायचं हाच जनतेचा निर्धार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माढ्याचा रखडलेला विकास करण्यासाठी अभिजीत पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.