राजकीय कुरघोड्यामुळे हुलजंती येथे होणारी कर्नाटकचे मुख्यमंत्री ना. सिदद्धरामय्या यांची सभा स्थगित झाली, ती सभा मंगळवेढा येथील आठवडा बाजारात झाली...
मंगळवेढा (प्रतिनिधी) - "होते ते चांगल्यासाठी" म्हणतात त्यातली गत आज भालके यांच्या समर्थकांनी अनुभवली. वास्तविक हुलजंती येथे सभा झाली असती तर त्या पंचक्रोशीतील जनतेची हजेरी लागली असती. मात्र आज मंगळवेढा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून काँग्रेस पक्ष आणि भालके यांचे बळ वाढविले.
फडणवीस हेच भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहेत हे स्पष्ट झाल्यामुळे फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असणारी जनता मागील ३/४ दिवसांत भाजपच्या विरोधात जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशातच कर्नाटकचे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व लिंगायत समाजाचे नेते व उद्योगमंत्री बी.एस. पाटील यांनी मंगळवेढ्याच्या सभेला हजेरी लावून कर्नाटक सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजना काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात राबवेल अशी ग्वाही दिली.
शिवाय संत बसवेश्वर स्मारकासाठी स्व. भारतनाना भालके यांनी मंजुरी मिळविली मात्र हे त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी कर्नाटक सरकार पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. तर धनगर समाजाचे आराध्य दैवत महालिंगराया देवस्थान हुलजंती येथे यात्री निवास उभारण्याची ग्वाही दिली.
एकूणच मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या लिंगायत व धनगर समाजाच्या आस्थेचे प्रश्न ऐरणीवर आणून ते सोडविण्याची ठाम भूमिका आजच्या सभेत मांडली गेली. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या हजारो नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे . या दोन्ही समाजाचा स्व. आ. भारतनाना भालके यांनी मिळविलेला विश्वास या सभेने दृढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. एकूणच जरांगे पाटील यांच्या भूमिकेला बळ देणारा मराठा समाज, दलित - मुस्लिम यांच्या जोडीला आता लिंगायत व धनगर समाज एकवटल्यामुळे मंगळवेढा तालुक्यात भालके यांची ताकद अनेक पटींनी वाढली आहे.