प्रलंबित विकास कामे तातडीने मार्गी लावावीत -- आ. समाधान आवताडे

0
तालुक्यातील विविध विकास कामाबाबत आढावा बैठक

           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील मंजूर विकास कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून संबंधित खात्यातील प्रलंबित असलेली विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या.

               शेतकी भवन पंचायत समिती पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे  यांच्या उपस्थित तालुक्यातील विविध विकास कामाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच तालुक्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

               तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना, रस्त्यांची कामे, घरकुल योजना, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन , तीर्थक्षेत्र योजना, नागरी सुविधा, महावितरण, पाटबंधारे आदी विभागांची सखोल माहिती आमदार आवताडे यांनी घेवून कामे वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या. तसेच रांझणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत असून सदर कामांची तात्काळ पाहणी करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी अशा सूचना आमदार अवताडे यांनी  दिल्या.  परिवहन विभागाने पंढरपूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ करावा.

          पंढरपूर येथे दररोज येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या विचारात घेता एसटी महामंडळ विभागाने  बस स्थानक कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. महावितरण विभागाने शेतकऱ्यांसाठी मंजूर असलेले रोहित्र तात्काळ बसून कार्यान्वित करावेत. तसेच  ग्रामीण भागात मंजूर कामांच्या पूर्ण होण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून ग्रामस्थ आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करावेत व उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचनाही आमदार आवताडे यांनी दिल्या.

                यावेळी  नगरपालिका, महावितरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, परिवहन, एस.टी.महामंडळ, पाटबंधारे आदी विभागाच्या विभाग प्रमुखांनी  मंजूर व सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)