दिनांक 01 डिसेंबर रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सचिन कुलकर्णी (पिं.चिं. शहराध्यक्ष), दिलीप कुलकर्णी (प्रदेश सरचिटणीस), महेश बारसावडे (पिं.चिं. कार्याध्यक्ष) यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून मनोज श्रोत्री यांचा सन्मानपत्र, श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
श्रोत्री यांनी आतापर्यंत तहसिल कार्यालय पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट व उपविभागीय अधिकारी, पंढरपूर व मंगळवेढा इत्यादी ठिकाणी सेवा बजावली असून, त्यांना सुमारे 29 वर्षे महसूल सेवेचा अनुभव आहे. या सेवा कालावधीत आतापर्यंत केलेली उल्लेख कामे तसेच व्यवस्थापक म्हणून मंदिर समिती मार्फत कार्तिकी यात्रा 2024 चे केलेले नियोजन व भाविकांना देण्यात येणा-या सोई सुविधांचा विचार करून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा तर्फे सन्मान करण्यात आला आहे. श्रोत्री यांनी आतापर्यंत महसूल सहायक, अव्वल कारकून / मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार इत्यादी पदावर काम केले असून, प्रत्येक पदाची उंची वाढविली आहे.
मानवी मनाला परमानंद देणारी गोष्ट म्हणजे यश ! आम्हास आपल्या कामगिरीचा सार्थ अभिमान वाटतो, आपण समाजा समोर एक उत्तम आदर्श ठेवलेला आहे. आपले कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरो, भविष्यात आपणा कडून विधायक कार्य घडावे. त्यासाठी आपणास जनतेचे सहकार्य लाभावे व निरामय आरोग्य प्राप्त व्हावे अशाच प्रकारचे मान सन्मान मिळत राहो, आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या उत्तुंग कार्याबद्दल आपल्याला हे सन्मान पत्र देण्यात आले असल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी यांनी सांगीतले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलेल्या सन्मानाने अधिक सकारात्मक सेवा करण्याची ऊर्जा मिळाली असून, ती ऊर्जा पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी केले.