मुंबई (प्रतिनिधी) - प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीतील अयोध्या राम मंदिराशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लिखित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक मोशन पोस्टरमुळे सर्वांचे आकर्षण ठरत असून भक्त आणि चित्रपट रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता तयार झाली आहे. नुकताच या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि कॅप्शन चर्चेत आली आहे. "पुढच्या पिढयांना आपण कोणता 'राम' शिकवणार आहोत? रावणावर विजय मिळवणारा राम कि "रामराज्य" प्रत्यक्षात आणणारा आदर्श 'राजाराम'? हे दोन प्रश्न या कॅप्शनद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. समाजमाध्यमात याविषयी अनेक तर्कवितर्कांसह च्रर्चा सुरु झाल्या आहेत.
भस्मासुरी आगीच्या वावटळीत उभ्या असलेल्या एका पाठमोऱ्या व्यक्तीचा शक्तिशाली प्रतिमाविष्कार, तिच्या हातातील प्रभू श्रीरामांच्या झेंड्याचा तेजस्वी अभिमान आणि पार्श्वभूमीवर ऐकू येणारी प्रभू रामांच्या मंत्र - नामाची भक्तिमय धून असे मोशन पोस्टर चित्रपटगृहांसह सामाजिक माध्यमांवर झळकाल्यानंतर या चित्रपटाविषयी कमालीचे आकर्षण तयार झाले आहे. त्यामुळे आता नव्याने झळकलेल्या या फोटो आणि पोस्टमुळे चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार आहे? यात कोण कोण, कोणत्या कोणत्या, भूमिकांमध्ये आहेत याविषयीचे कुतूहल कायम आहे....
राममंदिर स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, ‘मिशन अयोध्या’ २३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. भक्तिभाव, राष्ट्रभक्ती, आणि मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणार आहे.