पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवून गणेश मंडळांनी एकीचे दर्शन घडवले त्याचबरोबर ज्या गणपती मंडळांनी पारंपारिक वाद्याचा वापर करत पूर्वापार चालत आलेले संस्कार जपले अशा मंडळांना तालुका पोलीस ठाण्याकडून गणराया सन्मानाने गौरविण्यात आले.
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणेशोत्सवात ज्या गावातील गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी एक गाव एक गणपती संकल्पना प्रत्यक्षात राबवून एक गाव एक गणपती स्थापना केली अशा गावातील गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांना तसेच पारंपरिक वाद्याचा वापर केलेल्या गणेश मंडळांना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक अशी निवड करून गणराया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तालुका पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व पोलीस कर्मचारी तसेच कार्यक्रमासाठी सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.