कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड यांच्यावतीने पंढरपूर शहरातील व तालुक्यातील 125 मुलींना सायकल वाटप - मा.आ.प्रशांत परिचारक
पंढरपूर (प्रतिनिधी) - शहरातील व तालुक्यातून दूर अंतरावरून चालत येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप टिळक स्मारक मैदान येथे करण्यात आले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक भागात आजही मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक गावात पाचवी नंतरची किंवा दहावीनंतरची शिक्षण सुविधा नसल्यामुळे अनेक मुलींना परगावी जाऊन शिक्षण घ्यावे लागते, मात्र शाळेपर्यंत जाण्यासाठी मुलींना कुठलीही वाहतूक सुविधा नाही किंवा तुटपुंजा स्वरूपाच्या सुविधा आहेत. त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षणही बंद केले जाते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक कुटुंबातील पालक आपल्या मुलींसाठी वाहतूक सुविधा किंवा सायकल खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते त्यामुळे शाळेत मुलींची मोठी गळती होते. ही गळती थांबवण्यासाठी सरकारने मुलींना शाळेपर्यंत जाण्यासाठी मोफत सायकल अनुदान योजना सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी सायकल उपलब्ध होत आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून शिक्षण घेण्यात मुलींची सक्षम संख्या ही वाढत आहे.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड यांच्या वतीने हा अत्यंत उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण 125 विद्यार्थिनींना सदर सायकलचे वाटप आज करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांचे आरोग्यही सुदृढ राहावे, हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी सायलकचा योग्य वापर करून प्रगती साधावी असे आवाहन मा.प्रशांत परिचारक यांनी केले.
तसेच मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचा सामाजिक विकास करण्यासाठी सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा होत आहेत. सायकल मिळाल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरील आनंदाला पारावार उरला नव्हता. तर मुलींच्या पालकांनी सायकली मिळाल्यानंतर मुलींना वेळेवर शाळेत ये-जा करता येईल, आणि अधिकचा वेळ अभ्यासाला मिळेल व शिक्षण पुर्ण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडचे रिझनल हेड मा. कुलदिल थोरगुले, मयूर परिचारक, लक्ष्मण शिरसट, गणेश अधटराव, सतीश मुळे, सुभाष मस्के, विक्रम शिरसट, अमोल डोके, ॲड.इंद्रजित परिचारक, ज्ञानेश्वर मोरे, इब्राहिम बोहरी, सुजितकुमार सर्वगोड, नवनाथ रानगट, नारायण शिंगण, संगिता पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष व सदस्य, लाभार्थी विद्यार्थी व पालक, शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.