स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १९३ वी जयंती साजरी
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून स्त्रियांनी शिकावे, सावरावे आणि सुशिक्षित व्हावे यासाठी आपले जीवन वेचले. आजची महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्य करत असताना आणि सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची हेळसांड होते, याकडे मात्र दुर्लक्ष करते. एक स्त्री म्हणून आपली कुठे, कशी, किती गरज आहे हे ओळखून ती काम करते. हे काम करत असताना मात्र त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडू नये. आपण कितीही मोठे अधिकारी असू दे, स्वतः मधील ‘ईगो’ आपण बाजूला ठेवायचा त्यामुळे समोरची व्यक्तींची विचारशक्ती, असलेले मतभेद समजून येतात. हे सर्व शिक्षणामुळे शक्य होते. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे विचार आजही आपल्याला उर्जा व प्रेरणा देतात.’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा (ग्रामीण) च्या पोलीस उपअधीक्षक तथा डी.वाय.एस.पी. विजयालक्ष्मी कुरी यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त डी.वाय.एस.पी. विजयालक्ष्मी कुरी ह्या मार्गदर्शन करत होत्या. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र गीत, स्वेरी गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानंतर डी.वाय.एस.पी. विजयालक्ष्मी कुरी यांनी ‘स्वेरी कॉलेज स्त्री शिक्षणाचे माहेरघर आहे. आम्हाला एक स्त्री या नात्याने याचा सार्थ अभिमान आहे’ हा मेसेज दिला.
प्रास्तविकातून स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या फुले दांपत्यांच्या माध्यमातून महिलांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी एक देणगी मिळाली आहे. पूर्वी सर्वात वंचित घटक म्हणून स्त्रीकडे पाहिले जायचे. त्यावेळी स्त्रीला कसं-बसं जगण्याचा अधिकार होता. शिक्षण घेण्याची बंदी होती. १८४८ साली सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यामधून मुलींसाठी पहिली शाळा काढली. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ‘चूल आणि मूल’ एवढाच होता. त्यावेळी फुले दांपत्याने पुढे येऊन समाजाची मानसिकता बदलण्याची भूमिका घेतली. तेथून खऱ्या अर्थाने महिला शिक्षित झाल्या. त्यावेळी शाळेत जाताना होणारा त्रास, अन्याय त्यांनी पचवले. ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत.’ असे सांगून ‘इगो पासून दूर रहा, माझं खरं आहे असं वाटत असताना समोरच्या व्यक्तीचेही खरे असू शकते ही मानसिकता तयार करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘संयम’ राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले विचार धाडसाने सादर करता आले पाहिजेत, हे महत्वाचे तीन कानमंत्र त्यांनी दिले.
पुढे बोलताना डी.वाय.एस.पी. विजयालक्ष्मी कुरी म्हणाल्या की, ‘स्वेरीमध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी संरक्षण, भीती मुक्त वातावरण, मुलींकडे वैयक्तिक लक्ष, योग्य निर्णय त्यामुळे या ठिकाणी प्रवेशासाठी प्रचंड गर्दी होते. परिस्थितीनुसार समोरच्या व्यक्तीची विचारसरणी, भावना ओळखणे आवश्यक आहे. आपल्यातील कमतरता दाखविण्याऐवजी वर्तणूक सावध असावी. फुले दाम्पत्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे, म्हणून वेळप्रसंगी आपल्यातील शक्ती जागृत करणे आवश्यक आहे. आजच्या युगात सोशल मीडिया वापरताना होणार्या चुका सुधारणे आवश्यक आहे. मोबाईल, लॅपटॉप या साधनांचा आवश्यक तेवढाच वापर करा. सध्या बरेच सायबर क्राईम घडत आहेत त्यामुळे सजग रहा, संगणकाचा वापर कमीत कमी करा. स्वतः अपडेट रहा, प्रगती करताना आपली अधोगती होणार नाही याची काळजी घ्या. संगणक युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अचुक करा अशा प्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांंना अनेक सूचना दिल्या. आपण महापुरुषांच्या जयंत्या यासाठी साजरा करतो की त्यांच्यातील महत्त्वाचे गुण आपल्याला प्रेरणा देत राहावेत.’ असे सांगून विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
पो.कॉ.स्वाती लोंढे यांनी निर्भया पथकातील कामकाजाचे स्वरूप सांगताना विद्यार्थिनींना महत्त्वाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी घरी जाताना, प्रवासात, वाहतुकीच्या वेळी वाहनावर असताना कोणी पाठलाग करत असेल, त्रास देत असेल तर अशा वेळेस निर्भया पथकाकडे तक्रार द्यावी. लहान जखम असताना वेळीच उपचार केले तर जखम मोठी होणार नाही. यासाठी आपल्याला दिलेल्या संस्कारावरून चालणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीचे ‘रिक्वेस्ट’ स्वीकारू नयेत, ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी. जर अडचण आलीच तर निर्भय पथकाचा मोबा.क्र.- ८९९९९३८०८० यावर संपर्क साधावा. तत्काळ कारवाई करून पुढील उपाययोजना केली जाईल. त्याचबरोबर जर कुठे बालविवाह होताना आढळल्यास १०९८ क्रमांक आणि महिलांच्या अडचणी असतील तर ११२ क्रमांकावर संपर्क साधावा असे त्यांनी आवाहन केले.
अध्यक्षपदावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘नोकरी करत असताना स्त्रियांना वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रेरणेने आपण आत्मविश्वासाने सामोरे जावे लागेल. असे सांगून संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई आदी संतांचे उदाहरण देवून ‘आता विश्वात्मके देवे....’ याचे महत्व पटवून दिले. यावेळी निर्भय पथकाच्या पो.कॉ.निर्मला वाघमारे, प्रा. रोहित कुरी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, वसतिगृह व्यवस्थापक डॉ. करण पाटील, इतर प्राध्यापिका उपस्थित होत्या. डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
---------------------------------------------------
ये तो सिर्फ झाकी है...
स्वेरीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती नेहमी मुलींच्या वसतिगृहात साजरी केली जाते. पण सध्या परीक्षा सुरु असल्यामुळे विद्यार्थिनी परीक्षेत व्यस्त आहेत. त्यामुळे वसतीगृहाऐवजी इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी फक्त डिप्लोमाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या तरीही संपूर्ण हॉल तुडुंब भरला होता. त्यातून विद्यार्थिनीचे उत्साही चेहरे पाहून डी.वाय.एस.पी. विजयालक्ष्मी कुरी ह्या देखील प्रभावित झाल्या आणि पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षक पासून ते डी.वाय.एस.पी. पर्यंतचा २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सविस्तर सांगितला. यावेळी विद्यार्थिनी महत्वाच्या सूचना टिपून घेत असल्याचे पाहून त्या भारावून गेल्या. यावेळी सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे यांनी ‘ये तो सिर्फ झाकी है, अभी पुरा आसमान बाकी है...’ असे म्हणत वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थिनींची आकडेवारी सादर केली.
---------------------------------------------------