पंढरपूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यात तालुका स्तरावरील तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच महानगरपालिका, नगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन सुरू करावेत अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
नागरिकांचे प्रश्न, समस्या, अडचणी स्थानिक पातळीवरच सोडविल्या जाव्यात असे शासनाचे आदेश आहेत.त्यासाठी तालुका स्तरावरील लोकशाही दिन घेण्याचे आदेश आहेत. तथापि प्रत्येक महिन्यात पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील लोकशाही दिन नियमित सुरू आहे. मात्र सर्वांना जिल्ह्याचे मुख्यालय ठिकाणी उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडणे वेळ वआर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही हे लक्षात घेऊनच शासनाने तालुकास्तरावरील लोकशाही दिन सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. त्याची पूर्व प्रसिद्धी देवून ठरलेल्या दिवशी नियमित आयोजन केले जावे असे आदेश आहेत. त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तथापि हे होत असल्याचे निदर्शनास येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे प्रत्येक महिन्यात पहिल्या शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांनी तक्रार निवारण दिन घ्यावा, तिसऱ्या सोमवारी तहसीलदार यांनी त्यांचे कार्यालयात लोकशाही दिन , तसेच महानगरपालिका, नगरपालिका स्तरावरही लोकशाही दिन घेण्याचे आदेश आहेत त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी होत नाही, ती नियमित व्हावी जेणेकरून नागरिकांच्या अडचणी, समस्या तात्काळ सुटतील व शासनाचा हेतू सफल होईल अशी अपेक्षा प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा महिला प्रमुख सौ. माधुरी परदेशी, सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर यांनी व्यक्त केली आहे.