दि. 3 ते 19 जानेवारी 2025 कालावधीत सहा ठिकाणी कारवाई; चार लाख 51 हजाराचा दंडवसूल
पंढरपूर दि.11:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने मौजे.चिंचोली भोसे (ता.पंढरपूर) भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करण्यासाठी येणारा एक जेसीबी क्रमांक (क्र.एमएच 10 एस 7522) आज जप्त करण्यात आला आहे. तसेच दि. 03 ते 19 जानेवारी या कालावधीत महसूल पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करुन चार लाख 51 हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे. मौजे.चिंचोली भोसे ता.पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करून पळून जाताना आज एक जेसीबी जप्त करण्यात आला असून सदर वाहन शासकीय धान्य गोदाम येथे ठेवण्यात आले आहे. तसेच दि. 03 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत तालुक्यात अनवली, रोपळे, गुरसाळे, ओझेवाडी, चिंचोली तसेच पंढरपूर शहरातील जुना दगडी पुल या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन जेसेबी, चार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मौजे ओझेवाडी येथील 2.50 ब्रास वाळूसाठा नष्ट करण्यात आला आहे.
मौजे.चिंचोली भोसे ता.पंढरपूर या कारवाईमध्ये पथक प्रमुख मंडळाधिकारी रवींद्र शिंदे, विजय शिवशरण, ग्राम महसूल अधिकारी संजय खंडागळे, सुमित जाधव, संदीप शिंगारे, महेशकुमार सावंत, गणेश पिसे, महसूल सेवक कुंडलिक शिंदे सहभागी होते.