मिशन अयोध्या चित्रपटाचा मराठवाड्यात धुमाकूळ

0
छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ शो हाऊसफुल्ल !

        छ. संभाजीनगर (मनोरंजन प्रतिनिधी) - मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये या चित्रपटाने विक्रमी कामगिरी केली आहे. शुक्रवार, शनिवारचे मिळून तब्बल १५ शो या ठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली, ज्यामुळे चित्रपटगृहांबाहेरही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
          मराठवाड्यातील बालेकिल्ल्यात मिळालेला अफाट प्रतिसाद फक्त छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ संपूर्ण मराठवाड्यात या चित्रपटाने यशाची पताका फडकवली आहे. मराठवाड्यातील २३ चित्रपटगृहांमध्ये ‘मिशन अयोध्या’ हाऊसफुल्ल होताना दिसला. अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक वितरकांसह निर्मात्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील लोणावळ्यातीलही हाऊसफुल्ल शो

          मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील लोणावळा येथेही ‘मिशन अयोध्या’चे दोन शो हाऊसफुल्ल झाले. या ठिकाणीही प्रेक्षकांनी चित्रपटाला जोरदार दाद दिली, ज्यामुळे या यशाचा दरवळ हळूहळू इतर भागांपर्यंत पोहचत आहे.

यशाचे सूत्र
         मराठी संस्कृती, श्रद्धा आणि अयोध्येच्या ऐतिहासिक परंपरेचा उत्कृष्ट मिलाफ असलेल्या ‘मिशन अयोध्या’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रभावी कथानक, दमदार अभिनय, आणि दर्जेदार निर्मितीमुळे हा चित्रपट मराठी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करत असल्याचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे, दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे म्हणाले. 

उत्तुंग यशाची वाटचाल सुरूच...
         मराठवाड्यातील या अभूतपूर्व यशामुळे आता महाराष्ट्रातील इतर भागांतही ‘मिशन अयोध्या’ची चर्चा रंगू लागली आहे. हा चित्रपट आगामी दिवसांत आणखी महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही अशीच लोकप्रियता मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)