श्रीक्षेत्र आळंदी ( प्रतिनिधी ) - वेदांताचे चालते बोलते विद्यापीठ असणारे गुरुवर्य ह.भ.प.डाॅ.किसन महाराज साखरे (साधकाश्रम, आळंदी देवाची) (वय ८९) यांचे सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत माळवली. दि. २१ रोजी दुपारी त्यांचा अंत्यविधी श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या अलंकापुरी (आळंदी) नगरीत होईल.
" संत गेले तया ठाया । देवराया पाववी ॥"
ते चालते ज्ञानाचे बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंब ॥ येर माणुसपण भांब ।लौकिक भागु ॥
वारकरी सांप्रदायातील जेष्ठविभूती, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, देव देश धर्म कार्यासाठी अखंडित आपले जीवन व्यतीत करणारे, संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र यांची सोप्या भाषेत भाविकांना उकल करून सांगणारे, मराठीतून शेकडो ग्रंथसंपदा निर्माण करणारे, संत साहित्य व तत्त्वज्ञानावर महाराष्ट्रातील शेकडो वृत्तपत्रातून अध्यात्मिक लिखाण करणारे, साप्ताहिक पंढरी संदेशचे सिद्धहस्त लेखक - गुरुवर्य ह.भ.प.डाॅ.किसन महाराज साखरे यांची
प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी ह्यदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
गु. साखरेमहाराज यांच्या पश्चात मुलगी यमुना कंकाळ, मुलगा श्री. यशोधन साखरे, श्री. चिदम्बरेश्वर साखरे असा परिवार आहे.
श्रीसंत साखरे महाराज परंपरेचे उत्तराधिकारी, वारकरी संप्रदायाचा चालता बोलता शब्दकोश, वेदांत व संत वांग्मय याचा अनुबंध आजन्म विशद करणारे व्यक्तिमत्व, प्रचंड ग्रंथसंपदेवर लिखित स्वरूपाचे चिंतन प्रकाशित असणारे एकमेव व्यक्तिमत्व ह.भ.प. डॉ किसन महाराज साखरे अनंतात विलीन झाले. त्यांना साप्ताहिक पंढरी संदेश परिवाराचे वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏