मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आमदार पाटील यांनी भेटून मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
पंढरपूर (प्रतिनिधी) - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पुर्व परीक्षा-२०२४ च्या पदसंख्येत वाढ होण्यासंदर्भात निवेदन दिले.
सन २०२४ यावर्षी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेअंतर्गत होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ पध्दतीची शेवटची परीक्षा असून लाखो विद्यार्थी सदरची परीक्षा त्यांच्यासाठी शेवटची संधी म्हणून पहात आहेत..
सध्या या राज्यसेवा २०२४ साठी शासनाकडून ४५७ पदांची मागणी पत्रे आयोगाला पाठविण्यात आली आहेत. परंतु लाखो विद्यार्थी शेवटची संधी म्हणून प्रयत्न करीत असतांना ही पदसंख्या अपुरी आहे. राज्यसेवा २०२२ साठी ६२३ पर्यंत पदसंख्या वाढवून सरकारने विक्रम केला होता. त्याच पध्दतीने राज्यसेवा २०२४ साठी देखील सर्व विभागांची अतिरिक्त मागणी पत्रे पाठवून पद संख्येत वाढ व्हावी अशी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्यसेवा परीक्षे मधील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांची एकूण ३५ संवर्ग येतात. त्यामधील १६ संवर्गातील एकाही पदाचा समावेश यावर्षीच्या जाहिराती मध्ये नाही. तसेच उपशिक्षणाधिकारी या पदाच्या ३४७ जागा रिक्त असल्याचे समजते, यातील किमान १०० जागांचा तरी यावर्षीच्या जाहिरातीमध्ये समावेश करण्यात यावा व उर्वरित १५ संवर्गातील पदे देखील वाढवून सदर विद्यार्थ्यांना न्याय देणे गरजेचे आहे.
त्यामुळे राज्यसेवा २०२४ च्या जाहिरातीसाठी एक अखेरची वेळ सर्व विभागाकडून अतिरिक्त मागणी पत्रे मागवून घेण्याबाबत सामान्य प्रशासनास तसे निर्देश दिले जावे या संदर्भात आमदार अभिजीत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली..