स्वेरीमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘मराठी आपली भाषा आहे. या भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वस्वी मराठी माणूस म्हणून आपली आहे. या भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषेच्या अनुषंगाने सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक विषयात संशोधन घडून नवे विचार प्रवाह विकसित होत आहेत ज्यातून मराठी भाषा संवर्धनाला नक्कीच हातभार लागेल.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि मुंबई येथील डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांच्या सूचनेनुसार ‘मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार’ करण्याकरीता दि.१४ ते दि.२८ जानेवारी २०२५ दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मातृभाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. याच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.खेडकर मार्गदर्शन करत होते.
प्रास्ताविकात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील म्हणाले की, ‘मराठी मातीत आपण जन्मलो असल्यामुळे आपण मराठी भाषेतून संवाद साधला पाहिजे. आपण अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत असलो तरी मराठी भाषेला विसरता कामा नये.’ असे सांगून त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेचे महत्व स्पष्ट केले. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. आपण मागच्या आठवड्यात शासनाच्या सूचनेनुसार ‘वाचन सप्ताह’ आयोजित केला होता. त्यातूनही आपल्याला शिकता आले. अवांतर वाचन करता आले. वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते. वाचनामुळे उत्सुकता आणि जागरूकता निर्माण होते. वाचनामुळे करिअर करण्यासाठी योग्य दिशा मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी ‘मोबाईल, टीव्ही व तथाकथित मित्र’ हे सर्व सोडून पुस्तकांशी मैत्री करावी. पुस्तके आपल्याला तारतात. वाचनामुळे पुढील आयुष्य देखील सुखकर होते.’ असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना प्रमुख मार्गदर्शक डॉ. खेडकर म्हणाले की, ‘भाषांतर करण्याचे सामर्थ्य निर्माण होणे आवश्यक आहे. अनेक विषय हाताळण्यात मराठी भाषा अधिक प्रगल्भ आहे,’ असे सांगून त्यांनी ‘तद्भव व तत्सम’ शब्दांची व्याख्या स्पष्ट केली. डॉ.खेडकर यांनी आपल्या भाषणातून, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, नामवंत लेखक यांची अनेक उदाहरणे देऊन मराठी भाषा संवर्धन करणे गरजेचे आहे.’ हे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी स्वेरीचे विद्यार्थी तसेच ग्रंथपाल प्रा. सतीश बागल, अमोल रोंगे, सतीश अनपट, सुधीर मोरे, दत्तात्रय आसबे आदी उपस्थित होते. प्रा.सुजित इनामदार यांनी सूत्रसंचालन केले तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा.अमेय भातलवंडे यांनी आभार मानले.