लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने केला दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर

0
 'दारूवर टाकू बहिष्कार व्यसनमुक्तीचा करू पुरस्कार'

          पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने हद्दीतील अवैद्य दारू विक्री व दारू दुकाने, ताडी विक्री कायमची बंद करण्याबाबत रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

          यावेळी सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीचा ठराव मांडला होता. 

           या ठरावाला उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले तर ठरावाच्या विरोधात एकही मतदान न झाल्याने सदरचा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले.

           याप्रसंगी सरपंच संजय साठे, उपसरपंच सौ. रुपाली कारंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य,लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, तंटामुक्त अध्यक्ष संभाजी कदम, सुरेश टीकोरे, आबासो पवार, विलास देठे, पोलीस पाटील इरकल मॅडम, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, समाधान देठे, गोवर्धन देठे, सागर सोनवणे, आशाबाई देवकते, विजयमाला वाळके, नंदकुमार वाघमारे, माजी उपसरपंच सचिन वाळके, अनिल सोनवणे, महादेव पवार, ग्राम विकास अधिकारी जयवंत खंडागळे यांच्यासह लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
            अनेक वर्षांपासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मनुष्यवस्तीत दारू विक्री केली जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या. 
याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन सरपंच संजय साठे यांनी दारूबंदीचा धाडसी निर्णय घेत 'दारूवर टाकू बहिष्कार व्यसनमुक्तीचा करू पुरस्कार' हे ब्रीदवाक्य घेऊन लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतने रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन अण्णाभाऊ साठे प्रशाले समोर करण्यात आले होते. 
 
               यावेळी दारूबंदी बाबत ठराव मांडल्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात वर करून दारूबंदी करण्याबाबत मतदान केले. सदर ठरावाच्या विरोधात एकही मतदान न झाल्याने सदरचा ठराव बिनविरोध बहुमताने संमत करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी जयवंत खंडागळे यांनी जाहीर केले.

            या विशेष ग्रामसभेनंतर सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)