२९ तक्रारींचे निवारण
पंढरपूर (प्रतिनिधी) - नागरिकांशी थेट संवाद साधता यावा तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे शनिवार दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 29 तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तक्रार निवारण दिनानिमित्त पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तक्रार अर्जा संबंधीत अर्जदारांना भेटून त्यांच्या तक्रारीबाबत चर्चा करुन अर्जदारांचे समाधान करुन तक्रारीचे निवारण केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर वगरे, सुनील पवार यांच्यासह संबंधित तक्रारदार उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. घोडके म्हणाले, तक्रार निवारण दिनी तक्रार दाखल करण्यासह दाखल तक्रारींच्या कार्यवाहीची माहिती तक्रारदारास दिली जाणार आहे. समोर आलेल्या अर्जानुसार तडजोडी आणि समझोता प्रयत्नही केले जाणार आहेत. यादरम्यान अधिकाधिक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच तक्रार दिनानिमित्त नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.