स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुणाईला नवा विचार, नवे संस्कार देण्याचे कार्य केले. ‘जगायचे कसे’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले तर ‘लढायचे कसे’ हे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांकडून शिकले पाहिजे. छ.शिवाजी महाराजांची युद्धनिती, प्रशासन व्यवस्था, गडकोट किल्ले, बांधणी, पायाभरणी, उत्तम प्रशासक, नेतृत्वगुण, दूरदर्शीपणा असे अनेक महत्त्वाचे गुण राजांच्या कार्यातून डोकावतात म्हणून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा लागेल. स्वराज्य निर्माण करताना त्यांनी केलेला संघर्ष ऐकताना आपल्यात चैतन्य निर्माण होते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींतून लढण्यासाठी बळ मिळते. आलेली संकटे ही भीतीने पळून जाण्यासाठी नव्हे तर काहीतरी नवीन निर्माण करण्याची संधी निर्माण करते हे राजांच्या निर्णयावरून दिसून येते. यासाठी तरुणांनी मरगळ झटकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगिकार करावा.’ असे प्रतिपादन कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मध्यवर्ती असलेल्या भव्य ओपन एअर थिएटरमध्ये आयोजिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर पाटील हे शिवविचार मांडत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व प्राचार्य डॉ.जे.जी. जाधव हे होते. शिव आरती, महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले, ‘महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनण्यासाठी ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर जाऊन काम करणे आवश्यक आहे आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करण्याची प्रेरणा ही शिवाजी महाराजांकडून मिळते. म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व कुटुंबाची, समाजाची व देशाची सेवा करण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करावे'. असे सांगून जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन महत्वाचे कानमंत्र दिले.
प्रा. पाटील पुढे म्हणाले की, ‘प्रामाणिकपणा अंगीकारायचा असेल तर शिवचरित्र वाचा. कारण ते मरायला नाही तर जगायला शिकवते.’ असे सांगून प्रा. पाटील यांनी औरंगजेबासह शाहीस्तेखान, मुकर्रब खान, अफजल खान, फाजल खान, उदयभानू राठोड, संभाजी कावजी, जीवा महाले, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, येसाची कंक या व्यक्तींवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. पुरंदरचा तह, गनिमी कावा, वासोटा किल्ला, सुरतवरील हल्ला या अशा अनेक घटना तारखेसह सांगितल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.जे.जी. जाधव म्हणाले की, ‘या पृथ्वीतलावर अनेक राजे होऊन गेले परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जयंती साजरी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच केली जाते. त्याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे कल्याणकारी राजे होते. त्यांच्या कार्याचे अनुकरण करावे. राजे हे रयतेसाठी लढणारे राजे होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा जरी दिली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. एवढी ऊर्जा राजांपासून मिळते. शिवजयंतीच्या निमित्ताने स्वेरीतील उत्साही वातावरणातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पालखी पूजन पाहिले असता या विद्यार्थ्यांचा व स्वेरी संस्थेचा अभिमान वाटतो कारण डॉ. रोंगे सर हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे कार्यपुढे नेत आहेत असे दिसून येते. समाजातील वंचितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले तर डॉ.रोंगे सरांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी विद्यार्थिनींना तंत्रशिक्षण देण्याचे कार्य करण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती केली. श्रीमंतांची मुले शिक्षणासाठी परदेशात जातात पण पंढरपूर आणि पंचक्रोशीतील विद्यार्थी परदेशात न जाता स्वेरीत शिक्षण घेतात याचा अभिमान वाटतो.’ यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिवचरित्राविषयी प्रश्न विचारले असता प्रा. पाटील आणि प्राचार्य डॉ. जाधव यांनी अभ्यासपूर्ण व समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त बी.डी.रोंगे, विठाई पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, डिग्री इंजिनिअरींगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी सचिवा नम्रता घुले, अर्चना कोंगारी, प्रणव कवडे, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, इंजिनिअरिंग व फार्मसीच्या पदवी व पदविकेमधील विद्यार्थी उपस्थित होते. गायत्री जाधव, समृद्धी पाटील व डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.