पंढरपूर - येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन समारंभ समिती, राष्ट्रीय सेवा योजना आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे आणि उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रतिमा पूजनानंतर, "छत्रपती शिवाजी महाराज - एक व्यवस्थापन गुरु" या विषयावर प्राध्यापक डॉ. उमेश साळुंखे यांनी व्याख्यान दिले. ते आपल्या व्याख्यानात म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य वापरले होते. त्यांच्या राज्याची मध्यवर्ती संकल्पना कल्याणकारी राज्य होती. त्यांनी आस्मानी आणि सुलतानी संकटांना धैर्याने तोंड दिले. शिवाजी महाराजांनी 'गनिमी कावा' या संकल्पनेचा योग्य वापर करून रयत आणि राजा यांच्यात आत्मिक संबंध निर्माण केले. त्यांच्या राज्यात रयतेप्रती निष्ठा, स्वामीनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा यावर भर दिला होता. या निष्ठेमुळेच लोक स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्यास तयार होते".
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १८ व्या वर्षी आदिलशहाचा पराभव करून जावळीच्या मोऱ्यांवर वचक बसवला होता. त्यांनी ३५ वर्षांच्या कालखंडात ११ किल्ले बांधले आणि स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या स्थापनेसाठी त्यांनी ६०० मावळे सोबत घेऊन कार्यास सुरुवात केली आणि शेवटी तीन लाख मावळे स्वराज्यासाठी जोडले".
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय समारंभ समितीचे प्रमुख प्रा. डॉ. दत्ता डांगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके यांनी केले. शेवटी, उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. रविराज कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमास राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुशील शिंदे, मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश शिंदे आणि इतर मान्यवर प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.