स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘पत्रकार’ हे समाजाला ताकत देण्याचे व कमी पडेल तिथे जागृती करण्याचे काम अहोरात्र करत आहेत ही बाब अभिनंदनीय आहे. लोकशाही देशात पत्रकारितेला ‘चौथा स्तंभ’ म्हणून गौरविले जाते. हा स्तंभ येणाऱ्या बदलत्या काळामध्ये समाज परिवर्तनात मैलाचा दगड ठरण्यासाठी त्यास स्वतःचे सामर्थ्य वाढविले पाहिजे. यासाठी एकत्र बसून वारंवार चिंतन करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘पंढरपूर प्रेस क्लब’ आणि ‘स्वेरी’ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये येत्या रविवारी, दि.०२ मार्च २०२५ रोजी ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर समाजासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी राज्यस्तरीय दुसऱ्या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.’ अशी माहिती स्वेरीचे सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी दिली.
सदर कार्यशाळेविषयी स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सविस्तर माहिती देताना म्हणाले की, ‘समाजाला सामर्थ्य देण्याचे काम पंढरपूरात अनादी काळापासून चालत आले आहे. ‘जेंव्हा नव्हते चराचर, तेंव्हा होते पंढरपूर’ असे म्हटले जाते. त्याच उद्देशाने पंढरपूर नगरीच्या कुशीत गोपाळपूरच्या माळरानावर स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर या संस्थेने सन १९९८ साली ‘अभियांत्रिकी महाविद्यालय’ हे लहानसे रोपटे लावले. आज हा परिसर आपणा सर्वांचे योगदान मिळाल्यामुळे बहरलेला दिसतो आहे तसेच महाविद्यालयाने ‘एन.बी.ए.’, ‘नॅक’ अशी मानांकने प्राप्त केलेली आहेत. मजल- दरमजल करत अनेक अवघड टप्पे स्वेरीने यशस्वीपणे पादाक्रांत केले आहेत, याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. स्वेरीने गुणवत्तेमध्ये भरारी घेतल्याचे आपण पाहत आहोतच. संपूर्ण महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी शिक्षणाची सध्याची अवस्था पाहता ‘स्वेरी’ने घेतलेले परिश्रम आणि आज मिळालेले यश हे निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे आणि हे सर्व करताना वेळोवेळी पत्रकार बंधूंचे सहकार्य लाभते. एकूणच स्वेरीच्या यशात पत्रकारांचे अनमोल योगदान आहे. हे सर्व करत असताना ‘पत्रकारिता’ या संदर्भात सामाजिक विचारमंथन व्हावे या हेतूने पत्रकारांसाठी राज्यस्तरीय दुसऱ्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यापूर्वी पहिली कार्यशाळा दि.२८ ऑगष्ट २०१८ रोजी आयोजित केली होती. त्या कार्यशाळेस अदभूत प्रतिसाद लाभला होता आणि आता या दुसऱ्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
येत्या रविवार, दि.०२ मार्च २०२५ रोजी आयोजिलेल्या कार्यशाळेत पहिल्या सत्रात सकाळी ८.३० ते ०९.३० ह्या वेळेत नोंदणी व चहा-पान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात सकाळी ९.३० वा एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उदघाटन होणार असून यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. दुसऱ्या सत्रात, परीसंवाद-१ मध्ये १०.३० ते ०१.३० मध्ये ‘पत्रकारीते समोरील आव्हाने आणि समाजातील सर्व घटकांचा पत्रकारिता या लोकशाहीतील चौथ्या स्तंभाबाबतीत हवा असलेला सहभाग’ या विषयावर चर्चासत्र होणार असून यामध्ये एनडीटीव्ही मराठीचे सहसंपादक राहुल कुलकर्णी व साधना मासिकाचे संपादक विनोद सिरसट यांचा सहभाग असणार आहे तर याचे अध्यक्षस्थान एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर हे भूषविणार आहेत. त्यानंतर जेवणासाठी दुपारी १.३० ते ०२.३० अशी वेळ आहे. तिसऱ्या सत्रात, परिसंवाद-२ मध्ये दु. ०२.३० ते सा.५.३० दरम्यान ‘पंढरपूर व वारकरी संत साहित्य संदर्भातील पत्रकारांचे योगदान’ या विषयावर चर्चा सत्र होणार असून यामध्ये ‘दैनिक सकाळ’चे संपादक श्रीराम पवार व ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांचा सहभाग असणार आहे. तर या सत्राचे अध्यक्षस्थान ‘महाराष्ट्र दिनमान’चे संपादक विजय चोरमारे हे भूषविणार आहेत. ही कार्यशाळा ही निशुल्क असून पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन ‘पंढरपूर प्रेस क्लब’ व ‘स्वेरी’ च्या वतीने केले आहे.
या कार्यशाळेसंबंधी अधिक माहितीसाठी स्वेरीचे जनसंपर्क अधिकारी संतोष हलकुडे (९८५०२४२१५५) व स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार (९५४५५५३८८८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.