राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर जिल्ह्याकडे दुर्लक्ष - ग्राहक पंचायत

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील बस गाड्यांची अवस्था पाहता महामंडळाचे या जिल्ह्याकडे अत्यंत दुर्लक्ष असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी  अध्यक्ष, व व्यवस्थापकीय संचालक यांना लिहीलेल्या पत्रात नोंदविले आहे.
              या जिल्ह्यातील बसस्थानके, बसेसची अवस्था, स्वच्छता ही अतिशय चिंताजनक आहे. मागील अनेक वर्षापासून सोलापूर जिल्हा वगळता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात नवीन आयशर बसेस मिळालेल्या आहेत. 
अनेक सवलतींमुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मात्र त्याप्रमाणात सुस्थितीतील बसेसची कमी संख्या, परिसर व बसगाड्यांची स्वच्छता, त्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे स्थानक परिसरातून अवैध वाहतूक वाढलेली आहे. ही सोलापूर जिल्ह्यातील वस्तुस्थिती पत्रातून  निदर्शनास आणून दिली आहे.
           
         सोलापूर जिल्ह्यात श्रीक्षेत्र पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा ही देशातील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात असुन महामंडळाला नफा मिळवून देणारी स्थानके आहेत. शेजारीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर आहे. या जिल्ह्यामध्ये सोलापूर, पंढरपूर येथील ई बसचे चार्जिंग स्टेशन सुरू झालेले आहे मात्र तेथून फक्त सोलापूर ते पुणे व सातारा या मार्गाशिवाय कोठेही ई बस सेवा अद्याप सुरू झालेली नाही. देशातील मोठे तीर्थक्षेत्र, सर्वात मोठे २८ फलाट असलेले बसस्थानक, मोठे उत्पन्न देणारे आगार म्हणून पंढरपूरचीओळख आहे. या ठिकाणचे चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे तथापि पुरेशा ई बसेस नसल्याने पंढरपूरसह  जिल्ह्यातील आठ आगारातून ई बस सेवा सुरू झालेली नाही. 
सोलापूर वगळता जिल्ह्यातील इतर आगाराला अनेक वर्षापासून नविन बस (ई बस शिवाय) मिळालेल्या नाहीत. आहेत त्यांची अवस्था किती चांगली आहे हा संशोधनाचा विषय झाला आहे. विशेषतः करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट येथून लांब पल्ल्याच्या मार्गांवरही जुन्याच गाड्या धावतात त्या अनेक ठिकाणी ढकलाव्या लागतात, बंद पडतात. सुस्थितीतील गाड्यांची संख्या अत्यंत तोकडी आहे
          करमाळा बसस्थानकाची अवस्था भयानक आहे. परिसरात खड्डे, मोकाट जनावरांचा वावर, रस्त्यात बस बंद पडणे, बस अस्वच्छ असणे, ब्रेक फेल होणे, ही नित्याचीच बाब झाली असून तेथेही अशा अनेक समस्या  आहेत. 
 सांगोला बस आगारातही सुस्थितीतील गाड्यांची संख्या कमी
             पंढरपूर येथे राज्यातील मोठे बसस्थानक आहे, परंतु मोडकळीस आलेल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावतात. काही वेळा अनेक बसेस रद्द होतात.
           फलाटाजवळ स्वच्छतागृहांची सोय नाही त्यामुळे प्रवाशांना मोकळ्या जागेचा वापर करावा लागतोय. अनेक वेळा दोन्ही बाजूच्या (१ व २८) फलाटाशेजारी छोटी स्वच्छतागृहे बांधावीत अशी मागणी केलेली आहे. त्याचा अद्यापही विचार न केल्याने परिसरात अस्वच्छता वाढत आहे. 
प्रवाशांना मिळणाऱ्या सोयीबद्दल अनेक घोषणा झालेल्या आहेत मात्र अंमलबजावणी होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
            गांभीर्याने व प्राधान्याने जिल्ह्यासाठी नवीन लालपरी बसगाड्या देणे, यंत्रशाळेत सर्व साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे, बस स्थानक व स्वच्छ बस, सौजन्याने प्रवाशी संवाद, इ. बाबींची पूर्तता प्राधान्याने होईल अशी अपेक्षा प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, महिला विभाग प्रमुख सौ. माधुरी परदेशी यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)