तीन पुरस्कारांसह इंजिनिअरिंगच्या सर्व विभागात विद्यापीठात प्रथम
पंढरपूर - गोपाळपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अस्मिता धनाजी सरवदे यांनी इंजिनिअरिंगच्या सर्व विभागात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे ‘राजश्री शाहु महाराज पुरस्कार-२०२४’, ‘कै.श्रीमान भाऊसाहेब गांधी सुवर्ण पदक’ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे माजी कुलगुरू ‘डॉ.बाबासाहेब बंडगर सुवर्ण पदक’ असे मिळून एकूण तीन पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यामुळे अस्मिता सरवदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
गोपाळपूरच्या माळरानावर १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरीने शिक्षणात अनेक उपक्रम राबवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षणात गोडी निर्माण केली आहे. आज २७ वर्ष होवून देखील स्वेरीने गुणवत्तेत सातत्य राखले आहे. स्वेरीत नित्य राबविल्या जाणाऱ्या नवनवीन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी यशस्वी होत आहेत. विद्यार्थी हे अभ्यासाबरोबरच क्रीडा, संशोधन अशा विविध क्षेत्रात आघाडीवर राहत आहेत. स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात असलेल्या अस्मिता सरवदे यांनी अभियांत्रिकी मध्ये सोलापूर विद्यापीठात सर्व विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. बक्षिसांचे तिहेरी मुकुट मिळविलेल्या अस्मिता सरवदे यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. अस्मिता सरवदे ह्या मुडवी (ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) या गावच्या असून त्यांनी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कॅपद्वारे स्वेरीत प्रवेश मिळविला. चारही वर्ष वसतिगृहात राहून अभ्यास केला आणि पहिल्या वर्षापासून त्या गुणवत्तेत आघाडीवर राहत होत्या. अस्मिता सरवदे यांनी १० पैकी ९.९८ सीजीपीए गुण मिळवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून, सर्व विभागातून प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे 'डॉ.बाबासाहेब बंडगर सुवर्ण पदक' हा पुरस्कार, सोलापूर विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांच्या सर्व शाखांमधून प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे ‘राजश्री शाहू महाराज पुरस्कार-२०२४’ तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे 'कै.श्रीमान भाऊसाहेब गांधी सुवर्ण पदक' प्रदान करण्यात आले. अस्मिता सरवदे यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण भोसले तसेच विभागातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षांत समारोह प्रसंगी अस्मिता सरवदे यांना तिहेरी पुरस्कार देवून गौरविण्यात आले तसेच स्वेरीमध्ये दुसऱ्या पदवीप्रदान सोहळ्यात आय. आय. टी. कानपूरचे माजी संचालक, शिक्षणतज्ञ व पद्मश्री डॉ. संजय धांडे यांच्या हस्ते पालकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वेरीच्या वतीने रोख रु. ३१ हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तब्बल तीन सुवर्णपदके मिळविलेल्या अस्मिता सरवदे यांचा स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मनियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, इतर अधिष्ठाता, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, इतर विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.