तक्रार करणाऱ्या सरपंचाला वन क्षेत्रपालाची दमदाटी
आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केला अधिवेशनात प्रश्न
मंगळवेढा (प्रतिनिधी) - मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथील दहा हेक्टर वन क्षेत्रावर 11000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट तयार करून त्याचे अंदाजपत्रक ही तयार केले त्या झाडांना पाणी देण्यासाठी टेंडर एकाच्या नावे करून प्रत्यक्ष पाणी वाटप 900 रूपये प्रति टँकर याप्रमाणे दुसऱ्याला दिले. प्रत्यक्षात लागवड दोन ते अडीच हजार झाडेच लावली पाणी फक्त वृक्ष लागवड करतानाच घातले त्यानंतर तीन वर्षे काही झाडे पावसाच्या पाण्यावर जगली यासंदर्भात डोनज गावच्या सरपंचाने या भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी माहिती मागितली असता वनक्षेत्रपाल यांनी तक्रार केल्यास तुमच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करीन असा दम दिला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून चौकशी करणार का? असा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान उपस्थित करून मंगळवेढ्यातील वनविभागाच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी डोनज येथे वन विभागाने केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला यामध्ये वनविभागाने गवत रोपण,सीसीटी, टीसीएम,चेक डॅम, मातीनाला अशी कामे कागदावरच दाखवून बिले काढल्याचा प्रकार केला आहे. वनविभागाने तालुक्यात शासकीय रोपवाटिका ही तयार केली नाही. 11000 वृक्ष लागवड कागदावरच दाखवून सध्या प्रत्यक्षात हजार वृक्ष ही जिवंत नाहीत. याबाबत त्या ग्रामपंचायत ने तक्रार केल्यानंतर त्यांनाच धमकावण्यात आले. पानवठे न केल्यामुळे आणि त्यामध्ये पाणी न ठेवल्यामुळे वनपरिक्षेत्रातील प्राणी मनुष्य वस्तीमध्ये पाण्याच्या शोधात येत आहेत व शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करत आहेत तसेच शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना भक्ष बनवत आहेत, तरी कागदावर बिले काढून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केला असता "तुमच्याकडे असलेले सर्व पुरावे द्या मी कारवाई करतो" असे उत्तर संबंधित वनमंत्री गणेश नाईक या मंत्र्यांकडून आमदार समाधान आवताडे यांच्या प्रश्नावर देण्यात आले.