रुग्णांवर व्यवस्थित उपचार करा,
एक्स-रे सिटीस्कॅन रिपोर्ट चार तासात द्या.... आ. समाधान आवताडे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक गैरसोय आहेत. उपचाराकरिता दाखल झालेल्या रुग्णांना व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांना शौचालय, स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून नागरिकांशी असभ्य वर्तणूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीची दखल घेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान तेथील रुग्णांनी आमदार समाधान अवताडे यांच्यासमोर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामधील असुविधांचा पाढाच वाचला.
अनेक पीडित रुग्णांनी आम्ही जखमी आहोत. आमच्यावर योग्य पद्धती उपचार केले जात नाही. उपचाराकरिता दाखल असलेल्या वार्डात स्वच्छता गृह नाहीत. जे आहेत ते बंद आहेत. वार्डमध्ये असलेले स्वच्छतागृह तुंबलेले असल्यामुळे ते बंद आहे अशी व्यथा अनेक रुग्णांनी व्यक्त केली. यावेळी सदर स्वच्छतागृहाची आमदार समाधान आवताडे यांनी पाहणी केली असता स्वच्छतागृहाला दोरीने बांधून ठेवले असल्याचे दिसून आले. सदर स्वच्छता गृह उघडल्यानंतर स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे दिसून आले. याबाबत आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना चांगलेच फैलावर घेतले. नागरिकांना होणाऱ्या गैरसोई तात्काळ दूर कराव्यात. नागरिकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील अनेक रुग्णांची आपुलकीने विचारपूस देखील केली. यावेळी रुग्णालयातील रुग्णांनी आम्हाला विविध प्रकारचे कागदपत्रे, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक मागितले जातात. ऍडमिट करताना मोबाईल क्रमांक व आधारकार्ड मागितला जातो. आमच्याकडे मोबाईल नाही मग आमच्यावर उपचार होणार नाहीत का..? अशा प्रकारचे रोखठोक सवाल विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उपस्थित रुग्णांनी विचारला असता आ. समाधान आवताडे यांनी एकाही व्यक्तीचा उपचार नाकारला जाणार नाही. सर्वांना योग्य पद्धतीने उपचार दिला जाईल असे आश्वासन दिले. तसेच उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांना योग्य पद्धतीने उपचार देण्यात यावा. रुग्णांची कोणत्याही प्रकारे आडवणुक केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यापुढे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येता कामा नये अशी तंबी देखील उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिली आहे.
यावेळी अनेक पीडित रुग्णांनी सिटीस्कॅन रिपोर्ट एक्स-रे रिपोर्ट वेळेवर उपलब्ध होत नाहीत. रिपोर्ट देण्यासाठी चार चार दिवसाचा कालावधी लागतो असे सांगितले. यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाला चार तासांमध्ये सिटीस्कॅनचा रिपोर्ट देण्याचे निर्देश दिलेले आहेत. आमदार समाधान आवताडे यांनी आज अचानक पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांची आपुलकीने विचारपूस करत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे समाधान आवताडे यांचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.