श्रीसंत नामदेव महाराज स्मारकासाठी आराखडा सादर करा - जिल्हाधिकारी

0
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या शिंपी समाज शिष्टमंडळास सुचना

       पंढरपूर (प्रतिनिधी) - समस्त शिंपी समाजाचे आराध्य दैवत, वारकरी संप्रदाय व भागवत धर्माचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक पंढरीत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून शिंपी समाजाने स्मारकासाठीचा आराखडा त्वरीत सादर करावा, अशा सुचना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिल्या आहेत. यामुळे लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार असल्याची माहिती संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली.
           संत नामदेव महाराज स्मारकासंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व शिंपी समाजातील शिष्टमंडळासमवेत आढावा बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी वरील सुचना केली. रेल्वे बोर्डाने पंढरपूर येथील 65 एकर क्षेत्रालगतची जमीन महाराष्ट्र शासनास हस्तांतरित केली आहे. या जागेवर संत नामदेव महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी समस्त शिंपी समाज, नामदेव समाजोन्नती परिषद, संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, केशवराज संस्था यांनी आराखडा सादर करावा. तो आराखडा शासनाच्या आर्किटेक्चरकडे देण्यात येईल. त्यानंतर अंतिम आराखडा तयार करून लवकरच स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.
             यावेळी अ.भा. नामदेव क्षत्रिय एकसंघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. महेश ढवळे, श्रीसंत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे, नामदेव समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सोलापूर शिंपी समाजाचे अध्यक्ष महेश रेळेकर, पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रथमेश परांडकर, नामदेव शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवराज चुंबळकर, पत्रकार राजेश केकडे, गुरुनाथ पतंगे, दास पतंगे, अनिल बोंडगे, धनंजय गोंदकर, एकसंघाचे उपाध्यक्ष नंदकुमार कोसबतवार यांच्यासह इतर जिल्ह्यातून आलेले शिंपी समाज बांधव  उपस्थित होते.
         यावेळी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी स्मारकाच्या जागेबाबत असलेले वाद आता संपुष्टात आले असून स्मारकाच्या उभारणीसाठी नामदेव समाजोन्नती परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. तसेच एकसंघाचे उपाध्यक्ष नंदकुमार कोसबतवार व धनंजय गोंदकर यांनी संत नामदेव स्मारकाचे काम लवकर सुरु व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
          संत नामदेव महाराज स्मारकाच्या जागेचा प्रलंबित प्रश्‍न सुटावा यासाठी अनेकांनी यापूर्वी वेळोवेळी प्रयत्नही केले होते. अ‍ॅड. महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या प्रयत्नांना यश आले असून पंढरपूर येथील संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या स्मारकाची जागा महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित झालेली आहे. शेगाव दुमाला येथील जमीन ग.नं. 157, क्षेत्र 6 हे 10 आर. ही रेल्वे विभागाच्या ताब्यातील जमीन दि. 31 जानेवारी 2025 रोजी पंचनामा करून राज्य शासनाने ताब्यात घेतली आहे. तसेच नोंदणीकृत आदलाबदल दस्त क्र. 513/2025 दि. 3 फेब्रुवारी रोजी करारनामा नोंदविलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सदरहू जागा ही संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकासाठी रिझर्व करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे सादर केलेला आहे. यामुळे संत नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)