ग्रामीण रुग्णालय करकंब व काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल" यांचे संयुक्त विद्यमाने शिबिर संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - ग्रामीण रुग्णालय करकंब येथे आज दि. 24 रोजी जिल्हाशल्य चिकित्सक मा. डॉ . सुहास माने सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी सर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा.डॉ .अभय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग तपासणी शिबिर व असंसर्गजन्य आजार निदान, तपासणी व उपचार पद्धत या बाबत "ग्रामीण रुग्णालय करकंब व पंढरपूर येथील काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल" यांचे संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन करकंब नगरीचे प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी ॲड.शरदचंद्र पांढरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी धन्वंतरी पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.
काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वर्षा काणे मॅडम (लेप्रोस्कोपीक व जनरल सर्जन) यांनी स्त्रियांमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या कर्करोग, त्यांची लक्षणे, प्रकार, प्रतिबंधात्मक तपासण्या, शस्त्रक्रिया याबाबत सखोल अशी माहिती सादर केली. रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती एकनाथ बोधले यांनी स्त्रियांमधील आजार व कर्करोग याविषयी माहिती दिली व स्तनाचा कर्करोग व गर्भाशय कर्करोग याविषयी रुग्णांची तपासणी ( cx स्क्रिनिंग व ब्रेस्ट कॅन्सर) याची तपासणी केली. त्याचबरोबर आज २४ मार्च "जागतिक क्षय रोग" दिनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा. अभय शिंदे यांनी क्षयरोग प्रतिबंध व उपचार या बाबत रुग्णाचे समुपदेशन केले व माहिती दिली.
गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ.सागर शिंदे यांनी मधुमेह रक्तदाब, हृदयरोग याबाबत सखोल तपासणी केली. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आजच्या शिबिरामध्ये खालील प्रमाणे रुग्ण संख्या तपासणी झाली.
ओरल स्क्रिनिंग 48, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग 52, Cx स्क्रिनिंग 18, उच्च रक्तदाब 46, मधुमेह 51, हृदयरोग (कार्डियाक) 10. अशा प्रकारे एकूण 225 रुग्णांची विविध प्रकारे तपासणी करण्यात आली.