डॉ. मिलिंद परिचारक यांची प्रमुख उपस्थिती
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे येथे दि १५ व १६ मार्च २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन 'ऋतुरंग २०२५' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गायन, नृत्य, नाटक, लावणी, गवळण अश्या अनेक कला प्रकारांची मुक्त उधळण करून विद्यार्थ्यानी वातावरणात चैतन्य निर्माण केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी दिली.
ऋतुरंग २०२५ च्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद परिचारक यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी बोलताना डॉ. मिलिंद परिचारक म्हणाले की, आयुष्यामधील ताणतणाव नाहीसे करण्यासाठी संगीताची जोपासना करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी सकारात्मकता हा गुण आवश्यक असून सध्याच्या पिढीमध्ये सकारात्मकतेचा अभाव दिसून येतो अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. तसेच विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपली प्रगती साधावी. आयुष्यामध्ये सुखी राहायचे असेल तर दुःखाची होळी व सुखाची रंगपंचमी करता आली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. मिलिंद परिचारक यांनी विविध वाद्यांचे सादरीकरण करून वातावरण आनंदमय करून टाकले.
यावेळी पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. एस. एम. लंबे यांचा तर उत्कृष्ट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. एम. एन. शेख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे , रजिस्ट्रार जी. डी. वाळके, कर्मयोगी समूहातील डिग्री इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक, नर्सिंग, फार्मसी, ज्युनियर कॉलेज या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.