पंढरपूर (प्रतिनिधी) - केवळ राजकीय व्देषापोटी पंढरपूरच्या आमसभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांना माढा व मोहोळच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष केले असून यापुढे त्यांच्यावर वैयक्तिक टीका केल्यास पांडुरंग परिवार त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचा इशारा पांडुरंग परिवारातील विविध पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेव्दारे दिला.
काही दिवसापूर्वीच पंढरपूर तालुक्याची आमसभा पार पडली. यामध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील व मोहोळचे आमदार राजू खरे यांनी परिचारक यांच्यावर विविध आरोप प्रत्यारोप केले. याबाबत पांडुरंग परिवारातील नेत्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक घेऊन याचा निषेध केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेस बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड, उपसभापती राजू गावडे, पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख, भाजपाचे किसान मोर्चाचे माउली हळणवर, पंडितराव भोसले, तानाजी वाघमोडे, माजी नगरसेवक अनिल अभंगराव, सुभाष मस्के, संतोष घोडके, डॉ.प्राजक्ता बेणारे, विश्रांती भुसनर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सतीश मुळे यांनी, आमसभेला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना बोलावणे हे लोकप्रतिनिधींचे अज्ञान असल्याची टीका केली.
आमसभेला पंचायत राज अर्थात तालुकास्तरीय प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी, सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभा घेतली जाते. यामध्ये नगरपरिषेदचा कोणताही संबंध नाही. आज पर्यंत स्व.औदुंबर अण्णा पाटील, स्व.सुधाकरपंत परिचारक, स्व.भारत नाना भालके हे आमदार होते. त्यांनी आमसभा घेतल्या मात्र कधीही नगरपरिषेदस आमंत्रण दिले नाही. मात्र माढा व मोहोळचे आमदारांनी संविधानाच्या विरोधात नवीन पायंडा पाडला असल्याचा आरोप केला.
प्रशांत देशमुख यांनी, स्वतःचे नाव वाढविण्यासाठी परिचारक यांच्यावर टीका करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. राजकारण हे निवडणुकी पर्यंत असते मात्र निवडून आल्यापासून एकही विकासकाम न करणार्या लोकप्रतिनिधींनी परिचारक यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात असलेले सुसस्कृंत राजकारणाला तिलांजली दिल्याची टीका केली.
हरिष गायकवाड यांनी, परिचारक हे अल्पसंख्याक जातीचे असल्याने त्यांच्यावर अकारण आरोप केले जात असून हा जातीयवाद करणार्यांचा निषेध करीत असल्याचे सांगितले. केवळ आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन ही स्टंटबाजी सुरू असल्याची टीका केली.
विठ्ठलच्या दराबाबत बोला
माढा विधानसभा निवडणुकीवेळी अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखाना उसाला साडेतीन हजार रूपये बिल देणार असे जाहीर करून मतं मिळवली होती. मात्र कारखान्याचा हंगाम संपला तरी अद्याप साडेतीन हजार रूपये दर देण्यात आला नाही. किंबहुना या कारखान्याने एफआरपी देखील दिली नाही. यामुळे लोकाच्या मतदारसंघात डोकावून पाहण्यापेक्षा आपण दिलेली आश्वासने आधी पाळा असा टोला प्रशांत देशमुख यांनी लगावला.
आमदार खरे यांनी स्वतःच्या घराचा रस्ता का केला
आमसभेत राजू खरे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना परिचारक यांच्या घरासमोरचा रस्ता का केला असा प्रश्न केला होता. याबाबत लक्ष्मण शिरसट यांनी, २०१८ साली नगरपरिषदेने जे रस्ते सुधारण्यासाठी सुचविले होते. त्यांचीच कामे आज सुरू आहेत. याचा निधी परिचारक यांनीच मंजूर करून आणल्यामुळे आज १३० कोटींची कामे सुरू आहेत. परिचारक यांचा बंगला २०२४ साली बांधून झाला आहे. रस्ता मंजूर २०१८ साली झाला आहे अशी माहिती दिली. मात्र परिचारक यांना प्रश्न विचारणार्या राजू खरे यांनी आपल्या घराकडे जाणार रस्ता का करून घेतला असा प्रश्न शिरसट यांनी उपस्थित केला.