‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर स्वेरीत दुसरी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘आज जगात काय होत आहे ते लगेच सर्वांना समजते. तंत्रज्ञानाच्या युगात जग खूप जवळ आले आहे, मोबाईलमुळे जग कवेत आले आहे. अशा वेळी पत्रकारांना मात्र सक्रीय रहावे लागते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अफाट संधी निर्माण झाली आहे त्यामुळे चांगली कौशल्याची कामे करायची आपली तयारी हवी. जगभरात शेती आणि नर्सिंग यामध्ये मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. आज उपलब्ध तंत्रज्ञानाचा उपयोग आपण विधायक दृष्टीने करावा.’ असे प्रतिपादन एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी केले.
पंढरपूर प्रेस क्लब आणि स्वेरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये ‘पत्रकारिता काल, आज आणि उद्या’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजिलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी संपादक राजीव खांडेकर हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते.
पत्रकारितेतील आद्यगुरु आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रतिमा पूजन, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत, व स्वेरीच्या गीतानंतर स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी स्वागतपर भाषणात स्वेरीच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, मिळालेली मानांकने व राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीत संतांचे असलेले महत्व व त्यानी समाजाच्या हितासाठी दिलेले योगदान आज आपण वारंवार संदर्भासाठी घेऊन कसे वापरता येईल आणि पंढरपूर आणखी कसे समृद्ध करता येईल याचा परामर्श घेवून पत्रकारांसाठी आयोजिलेल्या या कार्यशाळेविषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, ‘आज अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालायला हवी. केवळ नोकरीच्या मागे न लागता नेहमीच्या शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित करायला हवीत. आज पत्रकारितेचा उपयोग समाजासाठी होत असताना अनेक बदल होत आहेत. मातीमध्ये मिसळा, नैसर्गिक गोष्टीचा पुरेपूर वापर करा. खेड्यात, शेतात चांगले वातावरण मिळते. स्वच्छ ऑक्सिजन मिळतो. परंतु आज उपलब्ध असलेली ही संपत्ती आज धोक्यात आहे, ती वाचविण्याची गरज आहे.’ दुसऱ्या सत्रात ‘पत्रकारीते समोरील आव्हाने आणि समाजातील सर्व घटकांचा पत्रकारिता या लोकशाहीतील चौथ्या स्तंभाबाबतीत हवा असलेला सहभाग’ या विषयावर साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसट म्हणाले की, ‘दर्पण आणि दिग्दर्शन ह्या दोन गोष्टी पत्रकारीतेमधून डोकावत असतात. ‘दर्पण’ चांगले दाखविले तर ‘दिग्दर्शना’चे काम कमी होते. टिळक आणि आगरकर यांच्या काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात जमीन आसमानचा बदल झाला असून आज ध्येयवाद कमी झाला असून त्यात पेशा वाद सुरु झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मिडिया आल्यामुळे प्रिंट मिडीयाचा फायदाच झाला आहे. म्हणून समाज, लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे.’ असे सांगून पत्रकारितेपुढील आव्हाने सांगितली.
यावेळी चर्चासत्राच्या अध्यक्षीय मनोगतात एबीपी माझाचे खांडेकर म्हणाले की ‘आपली पत्रकारिता ही आग ओकणारी आहे की विझवणारी याची जाणीव असावी. पत्रकारिता हे ध्येय, पेशा, व्यवसाय व धंदा असा बदल होत आहे.’ तिसऱ्या सत्रात ‘पंढरपूर व वारकरी संत साहित्य संदर्भातील पत्रकारांचे योगदान’ या विषयावर ‘रिंगण’चे संपादक सचिन परब म्हणाले की, पंढरीचे वैभव सर्वदूर पोचवायचे असेल तर संतांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. संतांच्या विचारांची नव्या पद्धतीने पुन्हा मांडणी करावी लागणार आहे. साने गुरुजी, संत सोयराबाई धर्माची चिकित्सा, बसववचने,नाथ महाराजांच्या गाथा, अभंग यावर परब यांनी प्रकाश टाकून ए.आय. हे तंत्रज्ञान भविष्यात फायद्याचे की तोट्याचे यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून ‘महाराष्ट्र दिनमान’चे संपादक विजय चोरमारे म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांमध्ये वारकरी संप्रदायात कट्टरता जपणाऱ्यांचा शिरकाव झाला आहे. यामुळे प्रवाह प्रदूषित होत असून चळवळ प्रदूषित करण्याचा हा प्रयत्न आहे. जादूटोणा विधेयक विधानसभेत मांडत असताना अंधश्रध्दा निर्मुलनाचे काम डॉ. नरेंद्र दाभोळकर करीत होते. त्यांची हत्या झाली, त्याची जबाबदारी खरी तर वारकरी संप्रदाय व पत्रकारितेची आहे. आपल्याकडे एखादा मंत्री आला तर आपल्या भागातील विकासाचे प्रश्न विचारावे.’ सरकारला वेळोवेळी जागृत राहण्यासाठी पत्रकारांनी प्रश्नांचा पाठपुरावा केला पाहिजे. यावेळी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी, सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतील प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडियातील जवळपास ३५० पत्रकार, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी lआभार मानले.
---------------------------------------------------
ग्लोबल वॉर्मिग मुळे पृथ्वी सध्या धोक्यात आहे. ही वाचविण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. जर आत्ताच झाडे नाही लावली नाहीत तर प्रवास करताना भविष्यात ऑक्सिजनची बाटली सोबत घ्यावी लागेल. या कार्यशाळेच्या माध्यमातून तंत्रज्ञान व पत्रकारिता याची सांगड घालण्याचा प्रयत्न स्वेरीने यशस्वीपणे केला आहे.
- डॉ. प्रकाश महानवर,
कुलगुरू, पु.अ.हो.सो.वि.सोलापूर
---------------------------------------------------