म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे उन्हाळी आवर्तन ३० मार्चपासून सुरू होणार- आ. आवताडे

0
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
           मंगळवेढा (प्रतिनिधी) - म्हैसाळ योजनेचे पाणी उपसा करणारे पंप जुने आणि वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे त्याचा परिणाम पाण्याच्या वेगावर होत असून मंगळवेढा तालुक्याला पुरेशा दाबाने पाणी येत नाही. पुरेशा दाबाने पाणी यावे, यासाठी ४०० क्युसेक वेगाने पाणी वितरित होणे गरजेचे असून पंप हाऊस दुरुस्त करणे आवश्यक आहे. या दुरुस्तीसाठी १ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तो निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
               उमदी वितरिकेवरील गावांना आजपर्यंत कमी प्रमाणात पाणी मिळाले असून या पुढील काळात हे खपवून घेतले जाणार नसून पाईपलाईनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला असून यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात यावी व सदर कामाची चौकशी करावी. तसेच दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत  समाविष्ट करावे अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी कालवा सल्लागार समितीमध्ये केली. यावेळी त्यांनी उन्हाळी पाण्याचे आवर्तन 30 मार्चपासून सोडणार असल्याचा निर्णय झाल्याचेही सांगितले.
             नुकतीच मंत्रालयामध्ये यंदाच्या उन्हाळी हंगामासंदर्भात सांगली आणि सातारा पाटबंधारे कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत टेंभू, कृष्णा कोयना सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ, आरफळ कालवा व कृष्णा कालवा यासंदर्भात चर्चा झाली. मंगळवेढा वितरिका १, मंगळवेढा वितरिका २ आणि उमदी डीवाय वितरिका गावांना येत्या ३० मार्च २०२५ पासून उन्हाळी आवर्तन सुरू करण्याचा निर्णय, या बैठकीत घेण्यात आला.
        या बैठकीत बोलताना समाधान आवताडे म्हणाले की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील १९ गावांपैकी ८ गावांना आवर्तनाचे पाणी मिळत नाही. त्याची जलसंपदा मंत्री व संबंधित अधिकारी यांनी सर्व कामाची एकत्रित पाहणी करावी.
           मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचनसाठी रब्बी व उन्हाळी हंगामातील प्रकल्पवार सिंचनासाठीचा पाणीवापर व सिंचन आवर्तनांचे नियोजन करून एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यावेळी जर सिंचन आवर्तनांचे नियोजन करण्यात अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला तर  खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही आमदार आवताडे यांनी दिला.
          या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमारजी गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अरुण लाड, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपुले आणि जलसंपदा व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)