विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदार संघाच्या समस्यांकडे आ. अभिजीत पाटील यांनी वेधले लक्ष
माढा (प्रतिनिधी) - माढा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी मतदार संघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेत हिवाळी अधिवेशनानंतर पार पडत असलेल्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या केल्या.
सध्या उन्हाचा कडाका वाढत चालल्याने पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी माढा तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, माढा तालुक्यातील नागरिकांना दर १० ते १२ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो या संदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात. आष्टी तलाव व दारफळ-सीना माढा प्रकल्प या दोन्ही स्रोतांचा समन्वय करून माढा शहर व तालुक्याला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा.
यासाठी आवश्यक पाणीपुरवठा योजनांना तात्काळ मंजुरी मिळावी व निधी उपलब्ध करून द्यावा.
माढा तालुक्यात नवीन पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस कार्यालय स्थापन करावे.
माढा तालुक्यात सध्या माढा, कुर्डूवाडी आणि टेंभुर्णी ही तीन पोलीस ठाणी कार्यरत आहेत. मात्र मोडनिंब पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे तो तातडीने मंजूर करून या परिसरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करावी.
सध्या माढा तालुक्याचा काही भाग बार्शी व करमाळा या ठिकाणी जोडला जातो. त्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होते. यासाठी माढा येथे कार्यालय आणि स्वतंत्र युनिट स्थापन करावे.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारतीची गरज आहे. या ठिकाणी ५ एकर जागा उपलब्ध असून त्याचा वापर आदर्श पोलीस स्टेशन उभारण्यासाठी करावा. तसेच पोलीस वसाहत, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आणि आधुनिक सुविधा असलेले पोलीस स्टेशन यासाठी निधी मंजूर करावा.
याचबरोबर माढा व पंढरपूर परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करावे, यामध्ये भुईकोट किल्ला, माढा येथील छत्रपती शिवरायांचे जावई निंबाळकर यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी मंजूर करावा.
मनकर्णिका नदीचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. नगर विकास खात्यामार्फत या नदीला कॅनॉलचा दर्जा मिळावा आणि तिचा विकास करण्यात यावा.
माढेश्वरी तीर्थक्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे. पंढरपूरपासून जवळ असलेल्या या महत्त्वाच्या स्थळासाठी ५ ते ७ लाख भाविक दरवर्षी भेट देतात. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी आवश्यक निधी मंजूर करावा.
माढा व पंढरपूर शहरासाठी रिंग रोड व पायाभूत सुविधांचा विकास करावा.
माढा शहरासाठी रिंग रोड तयार करण्याची गरज आहे, यामुळे रहदारीचा प्रश्न सुटेल.
पंढरपूर शहरातही रिंग रोड आवश्यक आहे, कारण लाखो भाविक दरवर्षी येथे येतात आणि रहदारीच्या समस्येला सामोरे जावे लागते. माढा शहरातील रस्ते, पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी निधी मंजूर करावा.
पंढरपूर येथील पाणीपट्टी कमी करावी.
माढा व पंढरपूर शहरातील आरोग्य व गृहप्रकल्पांचे प्रश्न निकाली काढावेत.माढा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८९२ घरांचे काम पूर्ण होण्यासाठी निधी मिळावा.पंढरपूर येथील नामकिर्तन सभागृहाच्या कामात निष्कृष्ट दर्जाचे काम झाले असून चौकशी करून नवीन निविदा मंजूर करावी.
माढा तालुक्यात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकांसाठी निधी उपलब्ध करावा.
पंढरपूर शहरात सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी मंजूर करावा.
पंढरपूर शहरात तीन पोलीस ठाणी आहेत – ग्रामीण एक, ग्रामीण दोन आणि शहर पोलीस स्टेशन, परंतु पोलिसांची संख्या कमी आहे. ताण कमी करण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी.
पंढरपूर पोलीस वसाहतींची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. नवीन वसाहती उभारून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
या मागण्यासाठी विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अभिजीत पाटील यांनी आवाज उठून लक्ष वेधून घेतल्याने लवकरच यासाठी निधी मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.